राहुलकुमार अवचट

यवत: तृतीयपंथी समाजाकडून ‘स्त्रीभ्रूणहत्या थांबवा, मुलगी वाचवा’ हा हलता देखावा सादर करत समाजाला बहुमूल्य संदेश देत गौरी-गणपती उत्सव साजरा करण्यात आला.

यवत येथील तृतीयपंथी समाज मोठ्या भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करत असतो. बाप्पावर असलेल्या नितांत श्रद्धेपोटी दरवर्षी न चुकता हा समाज गौरी-गणपती साजरा करतो. तृतीयपंथी वाड्यात गौरी-गणपती बसविण्याची 39 वर्षांची परंपरा आहे. यावर्षीही तीच परंपरा राखून तृतीयपंथीयांनी वाड्यात पारंपरिक पद्धतीचा सामाजिक संदेश देत ‘स्त्रीभ्रूणहत्या थांबवा, मुलगी वाचवा’ हा हलता देखावा तयार केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर समजल्या जाणाऱ्या तृतीयपंथी समाजाने सामाजिक प्रबोधनाची धुरा खांद्यावर घेत यवत येथे अनेक वर्षांपासून अनोखा आदर्श निर्माण केला असून, सध्या महिलांवर होणारे अत्याचार, समाजात सुरू असलेली वाईट कृत्ये याबद्दल चिंता व्यक्त करत ‘मुलगी वाचवा, स्त्रीभ्रूणहत्या थांबवा’ हा संवेदनशील संदेश दिला आहे.

तृतीयपंथी समाजाच्या वतीने वर्षभरात श्रावण पाणी, नवरात्र उत्सव, दिवाळी यासारखे उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरे केले जात असून, यामध्ये ग्रामस्थही मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचे दीपा गुरु रंजिता नायक यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी केडगाव परिसरात स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचे प्रकरण उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्याची गरज अधोरेखित करत या देखाव्यातून ‘मुलगी ही ओझे नसून समाजाची शक्ती आहे’, असा संदेश देण्यात आला असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना कायद्याच्या माध्यमातून आळा घालण्याबरोबरच समाजानेही जागरूक आणि संवेदनशील होणे आवश्यक असल्याचा संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे.
स्त्रीभ्रूणहत्या थांबवा, मुलगी वाचवा या संदेशाबरोबरच राज्यात यंदा अनेक ठिकाणी दुष्काळाचे सावट असून, राज्यात भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकरी राजा सुखी होऊ दे, अशी मागणी या तृतीयपंथीयांनी गौरी-गणपतीकडे केली आहे.
तृतीयपंथी समाजाच्या गौरी-गणपतीसाठी अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या हस्ते आरती पार पडली. यावेळी तृतीयपंथी समाजाच्या रंजिता नायक, दीपा गुरु, महिला प्रदेश सचिव कांचन ढमाले, खामगावचे माजी सरपंच योगेश मदने, उद्योजक सागर खुटवड यांसह अनेक तृतीयपंथी शिष्य परिवार उपस्थित होते.
यवतकरांचे आकर्षण ठरताहेत तृतीयपंथींचा गौरी-गणपती
यवत व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये येथील गौरी-गणपती लोकप्रिय झाला असून, केवळ आकर्षक सजावट न करता सर्वधर्मसमभाव, वृक्षजोपासना, कोरोना योद्धा, बळीराजा, झाडे लावा – झाडे जगवा, यासारखे सामाजिक संदेश देणारे देखावेही यापूर्वी साकारले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांशी मिळून मिसळून वागत असल्याने त्यांना नेहमी आदराची वागणूक गावात मिळत असते. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी महिला आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
तृतीयपंथी समाजाचा उपक्रम आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी – वैशाली नागवडे
एकीकडे गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण, डीजे आणि इतर विषयांवर चर्चा होत असताना, यवत येथील तृतीयपंथी समाजाने गणेशोत्सवाला सामाजिक प्रगती आणि समाजप्रबोधनाची दिशा दिली आहे, हे कौतुकास्पद आहे. समाजात उपेक्षित समजल्या जाणाऱ्या समाजघटकाने स्त्रीभ्रूणहत्येसारख्या गंभीर विषयावर जनजागृतीचा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. त्यांचा हा उपक्रम आजच्या तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.







