मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. चार वर्षांपूर्वीच्या सत्तासंघर्षाची पुनरावृत्ती होताना दिसत असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. पक्षाच्या ६ महत्त्वाच्या खासदारांनी आपली वेगळी चूल मांडत स्वतंत्र गटाची घोषणा केली आहे. या राजकीय हालचालींना अत्यंत गोपनीयपणे ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव देण्यात आले आहे.

या बंडाची तयारी १० जूनपासूनच सुरू झाली होती. सूत्रांनुसार, नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीत या संपूर्ण मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला. १६ जूनच्या रात्रीपासून हे ६ खासदार संजय जाधव, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील वेगवेगळ्या मार्गांनी दिल्लीत एकत्र आले.

सध्या शिंदे गट अत्यंत संयमाने वागत आहे. कोणताही घाईचा निर्णय न घेता, ते कायदेशीर बाबींवर लक्ष ठेवून आहेत. हे बंडखोर खासदार १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपली भूमिका स्पष्ट करतील, असे समजते. त्यानंतर हे खासदार अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात सामील होण्याची शक्यता आहे.
सध्या सर्वांचे लक्ष लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भूमिकेकडे लागले आहे. जर या बंडखोर गटाला अधिकृत मान्यता मिळाली, तर शिंदे गटातील खासदारांची एकूण संख्या १३ वर पोहोचेल. याचा मोठा राजकीय लाभ आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार आहे.
ठाकरे गटाने आपल्या सर्व खासदारांना व्हिप बजावून पक्ष शिस्त पाळण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाची मागणी केल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा ‘शिंदे विरुद्ध ठाकरे’ हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे.






