New Rules: नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करणे गरजेचे आहे. 1 एप्रिलपासून पीएफ, सुकन्या समृद्धी योजना, एनपीएस आणि आयकर नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे 31 मार्चपूर्वी आवश्यक कामे पूर्ण केल्यास खाते सक्रिय राहते, कर बचत होते आणि दंड टाळता येतो.

प्रॉविडंट फंड (PF) खात्यात किमान 500 रुपये आणि सुकन्या समृद्धी योजना खात्यात किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. जर ही रक्कम वेळेत जमा केली नाही, तर खाते निष्क्रिय होण्याची शक्यता असते. विशेषतः मुलींच्या भविष्यासाठी असलेल्या सुकन्या योजनेत वेळेवर पैसे भरणे महत्त्वाचे मानले जाते.
याशिवाय, ज्यांनी अद्याप पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नाही, त्यांनी ते तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच कर्ज असलेल्या व्यक्तींनीही बँकेशी संपर्क साधून हप्ते वेळेवर भरावेत.
जुनी करप्रणाली निवडणाऱ्यांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळवण्याची ही शेवटची संधी आहे. यासाठी एलआयसी पॉलिसी, ईएलएसएस म्युच्युअल फंड, 5 वर्षांची फिक्स्ड डिपॉझिट किंवा मुलांच्या शिक्षणावर खर्च करून गुंतवणूक करता येते. 31 मार्चनंतर या आर्थिक वर्षासाठी ही सवलत मिळणार नाही.
घरकर्ज घेतलेल्या व्यक्तींनी 31 मार्चपूर्वी मुद्दल रक्कम भरल्यास आयकर कलम 80C अंतर्गत सवलत मिळू शकते. तसेच व्याजावरही वेगळी कर सवलत मिळते. त्यामुळे वेळेत आर्थिक नियोजन करणे फायदेशीर ठरते.







