नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात 26 दिवस उपोषण करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी उपोषण संपवल्यानंतर त्यांच्यावर टीका करणाऱ्या आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वांगचुक यांनी म्हटले की, एवढे दिवस कठोर उपोषण केल्यानंतरही आपल्या आंदोलनाच्या प्रामाणिकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, हे दु:खद आहे. जर सरकारसोबत कोणतीही तडजोड किंवा करार करायचा असता, तर इतके दिवस उपाशी राहून शारीरिक त्रास सहन करण्याची गरजच काय होती, असा सवाल त्यांनी केला.

आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या त्रासाचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर झोपावे लागले, मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि आरोग्याचीही पर्वा न करता संघर्ष करावा लागला, असे त्यांनी सांगितले. लडाखच्या थंड वातावरणापासून दिल्लीच्या उष्णतेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. या काळात आपले 11 किलो वजन कमी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
उपोषण संपवल्यानंतर काही लोकांनी फोन करून ‘केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीतच उपोषण का सोडले?’ असे प्रश्न विचारल्याचे वांगचुक यांनी सांगितले. अशा प्रश्नांमुळे आपल्याला वेदना झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, जर कोणताही फायदा किंवा (डील) सौदा करायचा असता तर 26 दिवस उपाशी राहण्याचा निर्णय घेतला नसता.
पाहा व्हिडीओ
AFTER 26 DAYS OF HUNGER DO I NEED TO PROVE MY SINCERITY !!!
Do please watch and help spread the word. Find the full 22 minutes video on my YouTube Channel: Sonam Wangchuk pic.twitter.com/6CO3tjZsSD— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 24, 2026
नीट परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. सरकारकडून काही आश्वासने मिळाल्यानंतर 23 जुलै रोजी रात्री उशिरा त्यांनी आंदोलन मागे घेतले होते.
मात्र, सोशल मीडियावर त्यांच्या निर्णयावर चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या आंदोलनामागे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचा मुद्दा होता आणि त्यात कोणतीही तडजोड केली नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.







