नवी दिल्ली: दिल्लीतील बॉम्बस्फोट (Delhi Blast) प्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहे. जम्मू-काश्मीर आणि दिल्ली पोलिसांसह एटीएसने (ATS) अनेक प्रमुख राज्यात मोठी छापेमारी केली आहे. या कारवाईदरम्यान दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून एटीएसने कानपूरच्या मेडिकल कॉलेजमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मोहम्मद आरिफ (32) आणि हापूर येथील डॉ. फारूक (34) या दोघांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय, सहारनपूरमधून डॉ. आदिल, फरिदाबादमधील डॉ. शाहीन सईद आणि तिचा भाऊ परवेझ अन्सारी यालाही लखनऊमधून अटक करण्यात आली आहे.

एटीएसने केलेल्या कारवाईत समोर आले आहे कि, डॉ. आदिल हा सहारनपूरमधील डॉक्टरांना जाळ्यात अडकवण्यासाठी काश्मिरी मुलींचा वापर करून ‘हनी ट्रॅप’ मध्ये अनेकांना अडकवत होता. छापेमारीत 14 मोबाईल फोनमध्ये अनेक संपर्क क्रमांक आणि मुलींचे आक्षेपार्ह फोटो आढळले आहेत.
आरिफ निसार दार उर्फ साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद दार यांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली. या आरोपींनी चौकशीदरम्यान मौलवी इरफान आणि डॉ. आदिल यांचे नाव सांगितले. मौलवी इरफान आणि जमीर अहमद अहंगर यांना अटक झाल्यानंतर डॉ. आदिलची भूमिका अधिक स्पष्ट झाली.
डॉ. आदिल हा 2023 पासून सुमारे एक वर्ष गायब होता. अखेर 6 नोव्हेंबर रोजी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी यूपी एटीएसच्या मदतीने त्याला सहारनपूर येथून ताब्यात घेतले. स्पेशल टास्क फोर्स (STF) सध्या आदिलच्या सर्व हालचाली आणि संपर्कांचा कसून तपास करत आहे.
दहशतवादाच्या जाळ्यात डॉक्टर आणि उच्चशिक्षित व्यक्तींनी अडकणे ही गंभीर बाब आहे. ‘हनी ट्रॅप’ सारख्या पद्धती वापरून अनेकांना दहशतवादी संघटनेत ओढण्याचा नवा पॅटर्न समोर आल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.







