दिल्ली: राजधानी दिल्लीमधील जंतरमंतर मैदानावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) निदर्शनांना काल सोमवारी हिंसक वळण लागले. संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याचा निर्णय या पक्षाने घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. संसदेकडे जाणाऱ्या आणि जंतरमंतरवर बसलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलीस व शीघ्र कृती दलाच्या जवानांनी कठोर बळाचा वापर करून लाठीचार्ज केला. या कारवाईत पोलिसांनी कोणतीही नरमाई न दाखवता आंदोलकांच्या डोक्यावर, पाठीवर आणि छातीवर लाठ्या बरसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या निर्दयी लाठीमारात अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून, एका तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेनंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, काल दुपारी पोलिसांनी आंदोलकांना हुसकावून लावले असले, तरी आज सकाळपासून आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर गोळा झाले आहेत. त्यांनी नव्याने व्यासपीठ उभारून पुन्हा निदर्शने सुरू केली आहेत.

दुसरीकडे, सोनम वांगचूक यांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या दडपशाहीचा निषेध करत, प्रकृती बिघडली तरी उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
तब्बल ३० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. बैठकीत पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सोनम वांगचूक यांची सुटका, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि NEET परीक्षेत आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली. दरम्यान, मंत्री नड्डा यांनी आंदोलन मागे घेऊन चर्चेच्या मार्गाने मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.







