तेलंगणा: एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जवळपास महिनाभरपासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे.

प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. त्यानंतर याप्रकरणी कोरटकरविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोरटकर फरार होता. अटकपूर्व जामीनासाठी त्याने कोर्टात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.
दरम्यान, पोलिस त्याचा शोध घेत होते अखेर तेलंगणामधून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कोरटकर गेल्या महिनाभरापासून फरार होता. कोरटकरच्या अटकेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र थोड्याच वेळात कोल्हापूर पोलिस अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पार पडणार होती. मात्र सुनावणी अगोदरच त्याला अटक झालेली आहे.







