शिमला: हिमाचल प्रदेशमध्ये (Big Breaking) मुसळधार पावसामुळे (Himachal News) डोंगरांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून बिलासपूर जिल्ह्यात भीषण भूस्खलनाची दुर्घटना घडली आहे. या घटनेत एक प्रवासी बस थेट ढिगाऱ्याखाली अडकली असून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अजूनही काही प्रवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ही घटना बिलासपूरमधील बल्लू पूल परिसरात घडली. अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला आणि त्याखाली बस चेंदामेंदा झाली. बसमध्ये साधारण 25 ते 30 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी स्वतःहून बचाव कार्य सुरू केले आणि लगेचच प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आतापर्यंत ढिगाऱ्यातून 3 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. अनेक प्रवासी अजूनही ढिगाऱ्याखाली असल्याचे दिसून येत असल्यामुळे बचाव कार्य रात्रभर सुरू राहणार आहे. मोठमोठे दगड बसवर कोसळल्याने वाहनाचा पूर्णतः चुराडा झाला असून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढणे ही प्रशासनासाठी मोठी धडकती झाली आहे. तरीही स्थानिक नागरिक व बचाव पथके एकत्र येऊन मदतकार्य सुरू ठेवत आहेत.

या घटनेबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त करत दिवंगत प्रवाशांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली आहे. याचबरोबर, राज्य सरकार या कठीण काळात पीडित कुटुंबियांसोबत ठामपणे उभे असून त्यांना आवश्यक असलेली सर्व मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री सुक्खू सतत जिल्हा प्रशासनाशी संपर्कात असून बचाव कार्याला वेग देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे आणि आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. शिमल्यातून ते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
या दुर्घटनेमुळे हिमाचल प्रदेश पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. डोंगराळ भागात सततच्या पावसामुळे जमिनीची पकड सैलावत असून भूस्खलनाच्या घटना वारंवार घडत आहेत. बिलासपूरमधील ही घटना त्याच मालिकेतील सर्वांत भीषण अपघातांपैकी एक ठरत आहे.







