मुंबई : शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (१३ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात होणार होती. मात्र, न्यायमूर्ती व्ही. मोहना अनुपस्थित असल्याने सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वकील असीम सरोदे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

या प्रकरणाचा निकाल ३० किंवा ३१ ऑक्टोबरपर्यंत लागेल आणि दिवाळीपूर्वी निर्णय येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळे दिवाळीनंतरच निकाल येण्याची शक्यता असल्याचा अंदाज सरोदे यांनी व्यक्त केला.

असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केल्यानंतर धनुष्यबाण चिन्हाच्या मुद्द्यावर ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता बाजू मांडतील. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात ज्येष्ठ वकील मणिंदरसिंग युक्तिवाद करणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील शेषाद्री नायडू, तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने अरविंद दातार बाजू मांडतील. त्यानंतर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांचाही चिन्हासंदर्भातील युक्तिवाद होणार असल्याचे सरोदे यांनी सांगितले.

या प्रकरणात १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका असून, वेगवेगळे वकील चार ते पाच आमदारांची बाजू मांडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला युक्तिवादासाठी पुरेसा वेळ द्यावा लागणार आहे. सर्व बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनाही एकत्रित मुद्द्यांचा विचार करून अंतिम युक्तिवादासाठी तयारी करावी लागेल, असे सरोदे यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणासाठी दररोज दुपारी २.३० नंतरचा संपूर्ण वेळ दिला, तर सुनावणी लवकर पूर्ण होऊ शकते. मात्र, इतर कामकाजामुळे या प्रकरणाला मर्यादित वेळ मिळाल्यास अंतिम युक्तिवाद आणि निकालासाठी दिवाळीनंतरपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अंदाज सरोदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी विविध न्यायालयीन प्रकरणांचा दाखला देत युक्तिवाद केला होता. त्यानंतर शिंदे गटाकडून नीरज किशन कौल यांनी आपली बाजू मांडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केल्याचेही सांगितले जात आहे. आता उर्वरित युक्तिवाद कधी पूर्ण होतात आणि सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय कधी देते, याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.






