Viral news: मुंबई : शहरातील गजबजलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात ड्युटीवर असलेल्या एका महिला ट्रॅफिक पोलिसासोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. वाहतूक नियंत्रण करत असताना एका महिलेनं पोलिसांशी वाद घालत त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी सुमारे 5:30 वाजता मरीन ड्राईव्ह परिसरात काही राजकीय नेत्यांच्या हालचालींमुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना बाजूला करण्याचे काम करत होते. त्यावेळी MH01 CD 8304 क्रमांकाची कार रस्त्यात उभी असल्याचे महिला पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी वाहन चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले.
मात्र गाडी बाजूला करण्याऐवजी कारमधून उतरलेल्या एका महिलेनं पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत जाऊन त्या महिलेनं अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच स्वतःला एका मोठ्या राजकीय नेत्याची नातेवाईक असल्याचे सांगत पोलिसांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. “तुला कपडे फाटेपर्यंत मारेन” अशा शब्दांत धमकी देत महिला पोलिसांचा अपमान केल्याचेही समोर आले आहे.
या घटनेनंतर संबंधित महिला पोलिसांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेची चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.







