मुंबई : एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी यूपीआय व्यवहारांबाबत महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. १ जानेवारी २०२७ पासून ५०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी मोबाईलवर एसएमएस अलर्ट पाठवले जाणार नाहीत. मात्र, ५०० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी एसएमएस अलर्टची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. बँकेने ग्राहकांना संदेश पाठवून या बदलाची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

नव्या नियमानुसार, ५०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेचा यूपीआय व्यवहार केल्यानंतर ग्राहकांना बँकेकडून एसएमएस सूचना मिळणार नाही. मात्र, याचा अर्थ व्यवहार अयशस्वी झाला असा होणार नाही. त्यामुळे लहान रकमेच्या व्यवहारांनंतर एसएमएस न आल्यास ग्राहकांनी गोंधळून जाऊ नये, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी मात्र एसएमएस अलर्ट नियमितपणे मिळत राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा बदल करण्यात आल्याचे बँकेने ग्राहकांना कळवले आहे.

एसएमएस अलर्टमध्ये बदल होणार असला तरी सर्व यूपीआय व्यवहारांसाठी ई-मेल अलर्टची सुविधा सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेकडे आपला ई-मेल पत्ता अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
ज्या ग्राहकांचा ई-मेल पत्ता बँकेत नोंदणीकृत नाही किंवा त्यात बदल झाला आहे, त्यांनी मोबाईल ॲप, नेट बँकिंग किंवा बँकेच्या शाखेत जाऊन तो अपडेट करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
१ जानेवारी २०२७ पासून लहान रकमेच्या यूपीआय व्यवहारांचे एसएमएस अलर्ट मिळणार नसल्याने ग्राहकांना व्यवहारांची खात्री करण्यासाठी इतर पर्यायांचा वापर करावा लागेल. यासाठी यूपीआय ॲपमधील व्यवहारांची नोंद, ई-मेल सूचना आणि बँक स्टेटमेंट तपासता येईल.
दैनंदिन खर्चांचा हिशेब ठेवणाऱ्या ग्राहकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आपला ई-मेल पत्ता आणि बँकेतील संपर्क माहिती अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.






