अंबरनाथ : बारावीच्या विद्यार्थिनीला अभ्यासात मदत करून चांगले गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकावर करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

केयूरकुमार राजेशभाई बोदर (वय २७) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो खासगी शिकवणी वर्गात भौतिकशास्त्र विषय शिकवत असल्याची माहिती आहे. पीडित विद्यार्थिनी कल्याणमधील एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षण घेत होती. तिला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असल्याने ती शिक्षकाकडून अभ्यासासाठी मार्गदर्शन घेत होती.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने अभ्यासात मदत करण्याचे आश्वासन देत विद्यार्थिनीला वेगवेगळ्या ठिकाणी नेले. कल्याणमधून कोपर रेल्वे स्थानक परिसरात नेल्यानंतर तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपीने विद्यार्थिनीचे खासगी अवस्थेतील फोटो काढून त्यांचा वापर करून तिला धमकावल्याचाही आरोप आहे. याबाबत कोणाला सांगितल्यास शिकवणी वर्गातून काढून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावात होती.
अखेर विद्यार्थिनीने आपल्या आईला विश्वासात घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाइकांच्या मदतीने तिने १४ ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.







