Mumbai Pune Rain : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून, हवामान खात्याकडून पुढील २४ तास वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे आणि पुण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यासाठी यलो अलर्ट दिला आहे.

मागील तीन दिवसांपासून मुंबई-पुण्यात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुंबई तसेच पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर पुण्यातील काही बिल्डिंगमध्ये देखील पाणी शिरले आहे. अशातच आता पुढील काही तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना प्रशासनाकडून काळजीचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासन देखील शहरात पूरपरिस्थिती आणि पाणी साचण्याच्या समस्येवर लक्ष ठेवून आहेत. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







