मुंबई महानगरपालिकेवर तब्बल 25 वर्षांपासून असलेली ठाकरे कुटुंबाची पकड यंदाच्या निवडणुकीत तुटली. भाजप–शिंदे गटाने मुंबईचा सत्ताकिल्ला सर करत महापालिकेच्या राजकारणात मोठा उलथापालथ घडवून आणली आहे. काल जाहीर झालेल्या निकालानुसार भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर ठाकरे गटाला 65 जागांवर समाधान मानावे लागले. एकेकाळी शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईत हा निकाल ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
)Raj Thackeray)

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मनसे आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत ही निवडणूक अत्यंत कठीण असल्याचे मान्य केले. “अचाट धनशक्ती आणि सत्तेच्या ताकदीविरुद्ध शिवशक्ती अशी ही लढाई होती,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांनी दिलेल्या संघर्षाचे कौतुक केले. (Raj Thackeray)
राज ठाकरे यांनी मनसेला अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली, मात्र पक्ष खचून जाणार नाही, असा ठाम विश्वासही व्यक्त केला. निवडून आलेले मनसेचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या हिताविरोधात काही घडल्यास आक्रमक भूमिका घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. “आपली लढाई ही मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी आहे,” असे सांगत त्यांनी ही लढाई दीर्घकालीन असल्याचे अधोरेखित केले.
हा निकाल मुंबईच्या राजकारणात बदलत्या समीकरणांचा संकेत देतो. भाजप–शिंदे गटाने विकास, सत्ता आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले, तर ठाकरे गटाला फूट, सत्तेपासून दूर राहणे आणि स्थानिक पातळीवरील असमाधानाचा फटका बसल्याचे चित्र आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल आणि मराठी अस्मितेचा मुद्दा किती प्रभावी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Raj Thackeray)






