पालघर: निवडणुकीच्या काळात (Palghar News) अंधश्रद्धा आणि जादूटोण्याचे प्रकार वाढत असताना, आता पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डहाणू तालुक्यातील कासा येथील स्मशानभूमीत अघोरी प्रथांसाठी वापरले जाणारे संशयास्पद साहित्य आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अंधश्रद्धेचा आणि जादूटोण्याचा प्रकार असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्मशानभूमीत लिंबू, शेंदूर, गुलाल, लाल कापड आणि महत्त्वाचे म्हणजे एक लाकडी क्रॉस यांचा समावेश होता. ही दृश्ये पाहिल्यानंतर, मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी येथे अघोरी विधी करण्याचा प्रयत्न केला असावा, असा तीव्र संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली असून पोलिस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिस कारवाईवर विश्वास ठेवावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.







