मुंबई: राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठाने प्रशासकीय सुधारणा निकषांमध्ये 100 पैकी 80 गुण मिळवत पहिला क्रमांक प्राप्त केला आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य शासनाकडून विविध शासकीय कार्यालये, संस्था व विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली आहे. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या संकल्पनेच्या दिशेने पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी प्रशासन उभारण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.
या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, विद्यापीठे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, आयोग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक कार्याचे मूल्यांकन करण्यात आले. तसेच सेवा पुरवठ्याची गुणवत्ता, वेळेचे नियोजन, कार्यालयीन कामकाजातील गती, नागरिकाभिमुखता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या निकषांवर 150 दिवसांत मुल्यांकन केले.
या सर्व निकषांवर प्रभावी कामगिरी करत मुंबई विद्यापीठाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामागे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे बोलले जात आहे.
मुंबई विद्यापीठाच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्य शासनाकडून लवकरच संबंधित प्रशासकीय विभागांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा सन्मान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षम, गुणवत्तापूर्ण आणि जबाबदार प्रशासनाचे प्रतीक ठरणार आहे. प्रशासकीय सुधारणा गुणांकनात मिळालेले हे यश भविष्यातही विद्यार्थी, शिक्षक आणि समाजासाठी अधिक सक्षम, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन देण्यास प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.





