मुंबई: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Manoj Jarange) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. विविध शहरांतील निवडणुकांमध्ये त्यांनी अमूक पक्षाला पाठिंबा दिल्याचे संदेश, पत्रके आणि ध्वनीचित्रफिती समाजमाध्यमांवर वेगाने (Maharashtra Politics) व्हायरल होत होत्या. विशेषतः “मुंबईत ठाकरेच हवेत” असा मजकूर असलेली ध्वनीचित्रफित निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. (Breaking News)

या पार्श्वभूमीवर मतदानाला काही तास बाकी असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी नवी ध्वनीचित्रफित प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी थेट शब्दांत सांगितले की, मराठा समाज म्हणून आम्ही कोणत्याही राजकीय आघाडीला किंवा पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. “महायुती असो वा महाविकास आघाडी – कुणालाही आमचा अधिकृत पाठिंबा नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडीओ आणि पत्रकांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन केले.
“माझ्या नावाने कुणी पत्रके छापत असेल किंवा जुने व्हिडीओ पुन्हा व्हायरल करत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये,” असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांमध्ये जर कुणी स्थानिक पातळीवर एखाद्या उमेदवाराला किंवा पक्षाला पाठिंबा दिला असेल, तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याचा मराठा आंदोलनाशी किंवा माझ्याशी काहीही संबंध नाही, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
मात्र, याचवेळी काही ठिकाणी ठाकरे बंधूंना पाठिंबा दिल्याचे जुने व्हिडीओ पुन्हा चर्चेत आले असून मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत मराठा समाजाने एकत्र उभे राहावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या खुलाशामुळे निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या अफवा, बनावट पत्रके आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओंवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मतदारांनी कोणत्याही सोशल मीडियावरील संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती आणि उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे मतदान करावे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या अशा अफवांमुळे लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जरांगे पाटील यांचा हा खुलासा केवळ राजकीय भूमिका स्पष्ट करणारा नाही, तर मतदारांना सजग राहण्याचंही आवाहन करणारा ठरतो.







