मुंबई: राज्यातील (Mahayuti Crisis) महायुतीमध्ये सामील असलेले दोन मुख्य पक्ष, भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील अंतर्गत तणाव शिगेला पोहोचला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे भाजपने शिंदे सेनेच्या नेत्यांना फोडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे शिंदे गटासमोर युती कायम ठेवायची कि नाही, असा मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

महायुतीतील भाजपने स्वीकारलेल्या आक्रमक भूमिकेमुळे शिंदे गटातील अनेक महत्त्वाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या सातत्याने होणाऱ्या ‘गळचेपी’मुळे शिंदे गट राजकीयदृष्ट्या कमकुवत होत आहे आणि युतीमधील तणाव या कारणामुळे शिगेला पोहोचला आहे.
याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. या उच्चस्तरीय भेटीनंतरही काहीच परिणाम नाही झाला. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
युतीत वाढलेला तणाव पाहता, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने संयमाने वागण्याचा सल्ला दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थिर ठेवण्यासाठी भाजप नेतृत्व सावधगिरी बाळगत आहे. यामुळे भाजपने थेट हस्तक्षेप टाळण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थिती अशी आहे की, दोन्ही पक्षांची अवस्था “राहू ही शकत नाही आणि सोडू ही शकत नाही” अशी झाली आहे. दरम्यान, येत्या काळात राज्याच्या राजकारणात काय मोठ्या घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







