ठाणे : मानपाडा परिसरात मंगळवारी रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कार्यालयात कार्यकर्ते उपस्थित असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी आत घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर मानपाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पूर्णेकर हे गणेश नगर भागातील त्यांच्या कार्यालयात होते. त्यावेळी काही कार्यकर्तेही कार्यालयात उपस्थित होते. रात्रीच्या सुमारास स्कूटरवरून आलेले काही हल्लेखोर कार्यालयाजवळ पोहोचले. त्यानंतर त्यांनी थेट कार्यालयात प्रवेश करत पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात एकूण 4 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे.

गोळीबारातील 2 गोळ्या पूर्णेकर यांच्या छातीला लागल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यालय परिसरात गोंधळ उडाला. आवाज ऐकून आसपासचे नागरिक घटनास्थळी जमा झाले. गंभीर जखमी अवस्थेत पूर्णेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून एका कॅमेऱ्यात काही संशयित व्यक्ती दिसून आल्याची माहिती आहे. या व्यक्तींनी चेहरा रुमालाने झाकलेला असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी करून संशयितांचा शोध घेतला.
या प्रकरणात निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती अशा एकूण 5 संशयितांची नावे समोर आली आहेत. त्यापैकी पप्या शिंदे आणि आकाश निमसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
पूर्णेकर यांच्या मुलगा राम पूर्णेकर यांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्याकडून धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. राजेंद्र शिंदे यांनी बैठक घेऊन हा प्रकार घडवून आणल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पडताळणी तपासातून होणे बाकी असून अधिक तपास सुरु आहे.







