मुंबई: मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर होताच (Eknath Shinde) राजकारणात पुन्हा एकदा “काय झाडी काय डोंगर” स्टाईल ड्रामा सुरू झाला आहे. देशाचं लक्ष लागलेल्या या निकालानंतर (Maharashtra Politics) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उचललेल्या एका निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित 29 नगरसेवक थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवण्यात आल्याने मुंबईत पुन्हा ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना महायुती म्हणून मैदानात उतरली होती. निकालानंतर महायुतीला सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत जवळ असलं, तरी प्रत्यक्षात मोठं यश भाजपलाच मिळालं आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ 29 जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र, तरीही सत्ता स्थापनेसाठी या 29 नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
मुंबई महापालिकेत सत्तेसाठी 114 चा जादुई आकडा गाठणं आवश्यक आहे. भाजपच्या संख्याबळाला शिवसेनेच्या नगरसेवकांची साथ मिळाल्याशिवाय हा आकडा गाठणं कठीण आहे. त्यामुळेच ठाकरे गट शिवसेनेचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी भीती शिंदे गटाला असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी मुंबईतील आपल्या सर्व 29 नगरसेवकांचा मुक्काम वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. सत्ता स्थापन होईपर्यंत हे नगरसेवक तिथेच ठेवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे “एकनाथ शिंदेंना कुणावर विश्वास नाही का?”, “नगरसेवक फुटण्याची भीती वाटतेय का?”, “ठाकरेंना महापौर बसवणं शक्य होईल का?” असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या हॉटेल पॉलिटिक्सवर उद्धव ठाकरे यांनीही टोला लगावला आहे. “फोडून आणलेली माणसं टिकवण्याचं टेन्शन त्यांना असणारच. कदाचित त्यांना भाजपचीही भीती वाटत असावी,” असा यॉर्कर त्यांनी टाकला आहे. ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलं आहे.
दरम्यान, या सगळ्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे कॅप्टन म्हणून तात्काळ उत्तर दिलं आहे. “कुठलीही पळवापळवी होणार नाही. आमचे नगरसेवक आमच्यासोबतच आहेत,” असं स्पष्ट करत त्यांनी राजकीय अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई महापालिकेची सत्ता केवळ प्रशासनाचा प्रश्न नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई आहे. त्यामुळेच या निकालानंतर सुरू झालेली हॉटेल पॉलिटिक्स, आरोप-प्रत्यारोप आणि विश्वास-अविश्वासाची खेळी येत्या काही दिवसांत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय होईपर्यंत मुंबईचं राजकारण ‘थरारक चित्रपटापेक्षा कमी नाही’, हे मात्र निश्चित.







