मुंबई: मुंबईच्या मालाड पूर्वेकडील कुरार आप्पापाडा परिसरात ड्रग्जच्या वाढत्या सेवनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात काही किशोरवयीन मुले ड्रग्जच्या नशेत असल्याचे दिसत आहे. यातील दोन मुले एका मुलाला जबरदस्तीने ड्रग्जचे इंजेक्शन देत असल्याचेही व्हिडीओत दिसत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मालाड पूर्वेतील आप्पापाडा परिसरातील शारदाबाई गोविंद पवार उद्यानात ही मुले ड्रग्जचे सेवन करण्यासाठी आली होती. पोलिसांच्या चौकशीत व्हिडीओमध्ये दिसणारी मुले अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. मृत तरुणासह तीन मुले उद्यानात आली होती. त्यापैकी दोन मुलांनी पहिल्यांदाच ड्रग्जचे सेवन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ड्रग्ज घेतल्यानंतर 19 वर्षीय तरुणाची प्रकृती अचानक बिघडली. त्याला नशेचा ओव्हरडोस झाल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

धक्कादायक बाब म्हणजे प्रकृती बिघडल्यानंतर तरुणाने आपल्या मित्रांकडे पाणी मागितले. मात्र, पाणी देण्याऐवजी मित्रांनी त्याला बाटलीतून दारू पाजल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर त्याची प्रकृती आणखी खालावली आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर ड्रग्जच्या विळख्यात अल्पवयीन मुलेही अडकत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुरार पोलिसांनी तातडीने कारवाई करत व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी ADR दाखल केला असून मृत तरुणाच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
स्थानिक नगरसेवक अजितराव रावराणे यांनी आप्पापाडा परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. या भागात सुमारे 28 ते 30 हजार लोकांची वस्ती असून डोंगराळ आणि वनविभागाच्या हद्दीतील परिसराचा गैरफायदा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस कारवाईसाठी गेल्यानंतर आरोपी जंगलात पळून जात असल्याचा दावाही त्यांनी केला. ड्रग्ज विक्रीविरोधात यापूर्वीही पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्याचे रावराणे यांनी सांगितले.







