मुंबई : अंधेरी परिसरातील हॉटेलमध्ये ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या कथित सेक्स रॅकेटचा सहार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका तरुणीची सुटका केली असून, तिची वैद्यकीय तपासणी करून तिला महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी ‘मोनू’ नावाच्या कथित दलालाविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांना अंधेरी परिसरात मोनू नावाचा व्यक्ती विविध हॉटेलमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार ऑनलाइन माध्यमातून महिलांना पाठवत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला.
पोलिसांच्या पथकाने बोगस ग्राहकाच्या माध्यमातून मोनूशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने व्हॉट्सॲपवर काही तरुणींचे फोटो पाठवले. संबंधित महिलेसाठी दोन हजार रुपये आणि हॉटेलच्या खोलीसाठी एक हजार रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने बोगस ग्राहकाला अंधेरीतील मरोळ नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले.

ठरल्याप्रमाणे २३ ऑक्टोबर रोजी बोगस ग्राहक हॉटेलच्या खोलीत थांबला. काही वेळाने तेथे एक तरुणी आली. त्यानंतर बोगस ग्राहकाने बाहेर तैनात असलेल्या पोलिसांना ठरल्याप्रमाणे इशारा दिला. पोलिसांनी तातडीने हॉटेलच्या खोलीवर छापा टाकून तरुणीची सुटका केली.

पोलिसांनी तरुणीची चौकशी केली. तिने मोनूनेच आपल्याला हॉटेलमध्ये पाठवल्याचे सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला महिला सुधारगृहात हलवण्यात आले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मोनू हा आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणी आणि महिलांना झटपट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ग्राहकांकडे पाठवले जात असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांपैकी निम्मी रक्कम तो स्वतःकडे ठेवत असल्याचाही आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणातील कथित दलाल मोनू अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर हॉटेलमध्येही अशा प्रकारे व्यवहार सुरू होते का, याचा पुढील तपास सहार पोलीस करत आहेत.







