मुंबई: मुंबईतील व्यावसायिकांना (Crime News) लक्ष्य करून सेक्सटॉर्शनच्या (Mumbai News) माध्यमातून लुटणाऱ्या एका टोळीला आरे पोलिसांनी केवळ 7 तासांत गजाआड केले आहे. 20 ते 25 वयोगटातील दोन पुरुष आणि दोन महिलांचा हा गट अनेक व्यावसायिकांना जाळ्यात ओढून लुटत असल्याचे धक्कादायक वास्तव तपासात पुढे आले आहे.

देवनारमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाला 24 वर्षीय शहरीन औरंगजेब कुरेशी हिने ओळखीचा बहाणा करून जाळ्यात ओढले. पवईतील एका हॉटेलमध्ये बोलावून त्यानंतर त्याला तिचे साथीदार गोरेगाव-आरे परिसरात घेऊन गेले. तिथे त्यांच्या टोळक्याने त्या व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि त्याच्या गळ्यातील तब्बल 4 तोळ्याची सोन्याची चेन हिसकावली. व्यावसायिकाने त्वरित तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच आरे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. देवनार आणि डोंबिवली परिसरात छापे टाकून फक्त 7 तासांत चारही आरोपींना अटक करण्यात आली. विशाल सिद्धार्थ वाघ (वय 27), नमेश नागेश सुर्वे (वय 23), जहागीर सलाउद्दीन कुरेशी (वय 25) आणि शहरीन औरंगजेब कुरेशी (वय 24) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून या टोळीने अशाच पद्धतीने आणखी किती लोकांना फसवले आहे, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे आरोपी वयस्कर व्यावसायिकांना लक्ष्य करून अशा पद्धतीने लूट करत होते. या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. आरे पोलिसांनी वेळेत आणि प्रभावी कारवाई करत या टोळीला गजाआड केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.







