मुंबई: ठाण्यातील मीरा भाईंदर परिसरात डेटिंग अॅपच्या (Crime News) माध्यमातून मोठी (Mumbai News) फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॅपन डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या दोन तरुणींनी एका 31 वर्षाच्या तरुणाला हॉटेलमध्ये पार्टीच्या बहाण्याने बोलावून तब्बल 1 लाख 83 हजार रुपयांना लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही तरुणींना अटक केली आहे. या तरुणींनी याच पद्धतीने इतर तरुणांचीही फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Breaking News)

अटक झालेल्या आरोपींची नावे अरुनिमा उर्फ रूथ लुकास नायडू वय 28 आणि बिमलादेवी श्रवणकुमार सिंग वय 30 अशी आहेत. रणजीत नावाच्या तरुणाने याबाबत तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रणजीतची हॅपन अॅपवर अरुनिमा हिच्याशी ओळख झाली आणि चॅटिंगमधून त्यांची मैत्री वाढली. त्यानंतर अरुनिमाने तिच्या मैत्रिणीसह हॉटेलमध्ये पार्टीसाठी येण्याचे रणजितला आमंत्रण दिले.
हॉटेलमध्ये भेट झाल्यानंतर, पार्टीदरम्यान रणजित दारूच्या नशेत धुंद झाला. त्याच वेळी दोन्ही आरोपी तरुणींनी त्याचे मौल्यवान सामान आणि एकूण 1 लाख 83 हजार रुपयांचा ऐवज घेऊन तेथून पळ काढला. शुद्धीवर आल्यानंतर रणजितला आपल्याला फसवले असल्याचे लक्षात आले आणि त्याने तात्काळ पोलिसात फिर्याद नोंदवली.
पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर काही तासांतच दोन्ही तरुणींना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात या दोघींनी यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक तरुणांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस त्या संदर्भात तपास करत असून आरोपींकडून अधिक माहिती घेतली जात आहे







