मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 10 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीमधील आमदारांच्या रिक्त जागांवर कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्षासह सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. 27 मार्चला या पाच जागांसाठी मतदान पार पडणार आहे. भाजपच्या 3 आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा येणार आहे.

आता, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने तीनही पक्षांकडून उमेदवार ठरवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच भाजपकडून तीन नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्र भाजपकडून दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या तीन नेत्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.








