मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका अपघाताने नव्हे, तर त्यामागील कारणांनी वादळ उठवले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, यामागे एखादा मोठा कट होता का? असा संशय व्यक्त केला जात आहे. हे प्रकरण केवळ तांत्रिक बिघाडापुरते मर्यादित न राहता आता ‘फाईल, फोन आणि फ्लाईट’ या तीन सूत्रांभोवती फिरू लागले आहे.

नेमकं काय घडलं होतं त्या रात्री?
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवार रस्तेमार्गे बारामतीला जाण्याच्या तयारीत होते. मात्र, ऐनवेळी दोन घटना घडल्या ज्यामुळे निर्णय बदलला.
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव यांनी खळबळजनक दावा केला आहे की, त्या संध्याकाळी प्रफुल्ल पटेल किंवा अन्य एका बड्या नेत्याचा फोन आला होता. या फोननंतरच अजितदादांनी निर्णय बदलला. रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, एका वरिष्ठ नेत्याने एका विशिष्ट फाईलवर सही करण्यासाठी दादांना थांबवून ठेवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फाईल पूर्व विदर्भातील राईस मिलशी संबंधित किंवा एखाद्या मोठ्या कंत्राटाशी संबंधित होती. ही फाईल येण्यास उशीर झाल्यामुळे रात्री रस्तेमार्गे जाण्याऐवजी दुसऱ्या दिवशी विमानाने जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकरणावर संजय राऊत यांनी थेट ‘भ्रष्टाचाराच्या फाईल’चा अँगल जोडला आहे. दुसरीकडे, प्रमोद हिंदूराव यांनी थेट प्रफुल्ल पटेलांचे नाव घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.







