पुणे: पुणे (Pune News) आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या तस्करी करणारे रडारवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बँकॉकहून आलेल्या एका तरुणाने खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवून आणलेला तब्बल 5 कोटी 42 लाख रुपयांचा ‘हायड्रोपोनिक वीड’ (उच्च दर्जाचा गांजा) जप्त करण्यात आला आहे. सीमा शुल्क विभागाच्या (Customs) एअर इंटेलिजन्स युनिटने अत्यंत चाणाक्षपणे हा अमली पदार्थांचा साठा पकडला असून, तस्करीचा एक आंतरराष्ट्रीय कट उधळून लावला आहे.

बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’चे विमान बँकॉकहून पुण्यात उतरले. एअर इंटेलिजन्स युनिटला आधीच गुप्त बातमी मिळाली होती की, या विमानातून मोठी तस्करी होणार आहे. तपासणी सुरू असताना एका 32 वर्षीय प्रवाशाची घबराट अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. जेव्हा त्याच्या सामानाची झडती घेण्यात आली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. मुलांच्या खेळण्यांच्या बॉक्समध्ये अमली पदार्थांची पाकिटे लपवण्यात आली होती.
स्कॅनिंग मशीनमध्ये अमली पदार्थ ओळखता येऊ नयेत, म्हणून त्याने हे वीड चक्क कार्बन पेपरमध्ये गुंडाळले होते. साधारणपणे कार्बन पेपरमुळे आतल्या वस्तूची प्रतिमा स्पष्ट दिसत नाही, असा तस्करांचा समज असतो. मात्र, अनुभवी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बॅग उघडून तपासणी केली.







