मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने दिवाळीनिमित्त या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वीच त्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.

राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दरवर्षी दिवाळीनिमित्त भाऊबीज भेट दिली जाते. यंदाही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सणाच्या काळात आर्थिक मदत मिळणार आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या २,१४,०९७ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची पदे कार्यरत आहेत. यामध्ये १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० अंगणवाडी मदतनीसांचा समावेश आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही रक्कम थेट संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत जमा केली जाणार आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान मुलांच्या पोषणाशी संबंधित योजनांची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कामाचा सन्मान करण्यासोबतच दिवाळीचा आनंद वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळणार असल्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सणाच्या खर्चासाठी मदत होणार आहे.







