हिंदू शास्त्रानुसार गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र, गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीच हरतालिकेचा उपवास केला जातो. महिलांसाठी हा विशेष दिवस मानला जातो. यंदा 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकेचा सण साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिकेचा उपवास पाळला जातो.

या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तसेच भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी हा उपवास केला होता आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. त्यामुळे आजही महिलांसाठी या उपवासाला विशेष महत्त्व दिले जाते.

हरतालिका उपवासाचा मुख्य नियम असा आहे की हा उपवास निर्जळी करावा. म्हणजेच उपवासाच्या काळात अन्न, दूध, फळे आणि पाणी ग्रहण केले जात नाही. मात्र ज्या महिला आरोग्याच्या कारणास्तव असा उपवास करू शकत नाहीत त्यांनी तो टाळावा. जर एखादी महिला पहिल्यांदाच उपवास करत असेल आणि निर्जळी उपवास पाळणे शक्य नसल्यास तृतीया तिथीला सूर्यास्तानंतर रात्री 12 वाजल्यानंतर पाणी पिण्याची परवानगी असते.

या उपवासादरम्यान झोप घेणे वर्ज्य मानले जाते. महिलांनी जागरण करून भगवान शंकराच्या नामाचा जप करावा आणि त्यांची पूजा करावी. हरतालिकेचा उपवास तृतीया तिथीपासून सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या सूर्योदयापर्यंत चालतो. या उपवासाच्या दिवशी देवी पार्वती, भगवान शंकर आणि गणरायाची पूजा मातीच्या मूर्तींनी केली जाते.
महिलांनी या दिवशी देवी पार्वतीला सौभाग्यवस्तू अर्पण कराव्यात. माहेरहून आलेली साडी तसेच सौभाग्याचे लेणे परिधान करून त्या सजतात आणि पारंपरिक पद्धतीने पूजा करून हरतालिकेचा उपवास पाळतात. या विधीमुळे वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होते, असा विश्वास मानला जातो.







