पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाच समाजातील पाच जणांनी मिळून तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करत दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या जीवावर बेतण्याइतपत मारहाण करण्यात आली. ही घटना 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता वडकी नाला येथील भारत पेट्रोलपंपाजवळ, आंबेकर लॉन्सच्या समोर घडली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात विकी सुरेश खोमणे (वय 38, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ऋषिकेश हनुमंत चव्हाण (वय 32, रा. अंजनगाव, ता. बारामती), मयुर संजय चव्हाण (वय 30, रा. लक्ष्मीनगर, बारामती), तेजस तानाजी खंडाळे (रा. लखडेनगर, माळेगाव, ता. बारामती), सुरज बाबाजी खोमणे (रा. माळेगाव खुर्द), अक्षय ऊर्फ गोटू छगन माकर (रा. माळेगाव खुर्द, ता. बारामती) या पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकी खोमणे मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा आणि आरोपींचा संबंध एकाच समाजाशी आहे. 2011 मध्ये त्यांच्यात गंभीर वाद झाला होता. या वादावरून दोन्ही बाजूंनी पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या होत्या. 2017 मध्ये वाद मिटल्याचे समजले होते. मात्र आरोपींनी जुन्या वैमनस्याचा राग कायम ठेवला होता.

16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी विकी खोमणे यांच्यावर पाचही आरोपींनी अचानक हल्ला केला. लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून तसेच दगडाने मारहाण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
घटनेनंतर विकी खोमणे यांनी सुरुवातीला सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी त्यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली. त्यावरून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली.
आरोपी हे पूर्वीपासून गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले असून, पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्या वैमनस्याचा निकाल इतक्या उग्र पद्धतीने लावला गेल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







