पुणे: श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी म्हणजे नागपंचमी होय. आज, मंगळवार, 29 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रासह देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नागदेवतेची पूजा करून सर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि कुटुंबात सुख-समृद्धी येण्यासाठी नाग देवतेची पूजा करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. आज मंगळा गौरी व्रत देखील असल्यामुळे नागपंचमीचे महत्त्व आणखी वाढले आहे.

अशी करतात नागपंचमीची पूजा:

नागपंचमीच्या दिवशी भक्तगण सकाळी लवकर उठून स्नान करतात. त्यानंतर घरातील देवाऱ्यात किंवा स्वच्छ पाटावर नागदेवतेची मूर्ती, चित्र किंवा हळद-चंदनाने नागाचे चित्र काढून त्याची पूजा करतात. काही ठिकाणी वारुळातील नागाला दूध अर्पण केले जाते किंवा नाग मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते. पूजेमध्ये नागदेवतेला दूध, पाणी, हळद, कुंकू, तांदूळ (अक्षता), फुले, लाह्या, चणे आणि साखर यांचा नैवेद्य दाखवला जातो. धूप, दीप लावून “ओम नागदेवाय नमः” किंवा “ओम नमः शिवाय” या मंत्रांचा जप केला जातो. पूजेनंतर नागपंचमीची कथा ऐकण्याची आणि प्रसाद वाटण्याची परंपरा आहे.

नागपंचमी हा केवळ एक धार्मिक विधी नसून, निसर्गातील सर्प प्रजातींबद्दल आदर व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या संरक्षणाचा संदेश देणारा सण आहे. या दिवशी नागांना इजा न पोहोचवण्याचे आवाहन केले जाते.







