पुणे : राज्यातील मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार आगामी विस्तारात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, तर काही नवीन आणि जुन्या चेहऱ्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.या संभाव्य फेरबदलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हे आहेत.याउलट, नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, एका वादग्रस्त प्रकरणातील आरोपामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्यांच्यासोबतच पुणे जिल्ह्यातील मावळचे आक्रमक आमदार सुनील शेळके यांनाही कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता असून, त्यांच्या नावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे, विदर्भातील तरुण आमदार राजू नवघरे यांनाही या विस्तारात मंत्रिपदाची संधी देऊन महायुतीकडून प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.दरम्यान गेल्या काही काळात दोन वेगवेगळ्या प्रकरणांमुळे झिरवळ चांगलेच चर्चेत आले होते, ज्यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली होती. त्यामुळे पक्षाची प्रतिमा सांभाळण्यासाठी त्यांच्या जागी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. झिरवळ यांच्यासोबतच आणखी काही मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नवीन आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

या संभाव्य फेरबदलांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.








