पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं असताना एका गुप्त बैठकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या दोन बड्या नेत्यांच्या अचानक झालेल्या भेटीमुळे ‘शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार का?’, अशा चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही नेत्यांमध्ये महायुतीतील संभाव्य भागीदारीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.जर शरद पवार यांचा पक्ष महायुतीत सामील झाला, तर त्यांना सत्तेत नेमका कोणता वाटा मिळू शकतो, यावर या बैठकीत चाचपणी करण्यात आली. विनोद तावडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या पक्षातील आणखी एका वरिष्ठ नेत्याची भेट घेऊन पुढील रणनीतीवर संवाद साधला. या संभाव्य सत्तेतील सहभागाबाबत शरद पवार गटाची नेमकी भूमिका काय असेल, यावरही पक्षात खलबत सुरू आहे.

दुसरीकडे, जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांच्यासोबत भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, ही भेट केवळ एक अनौपचारिक चर्चा होती, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.विशेष म्हणजे, काही काळापूर्वी अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा रंगली होती. दोन्ही गट एकत्र आले असते, तर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर एनडीएसोबत जाणे पसंत केले असते की इंडिया आघाडीसोबत, हा प्रश्न मोठा होता.
परंतु, अजित दादांच्या अपघाती निधनामुळे हा राजकीय सस्पेंस कायमचा अनुत्तरित राहिला. आता जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यातील या नव्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन कलाटणी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






