राहुलकुमार अवचट

पुणे: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या यवत येथील सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यवत परिसरातील पुणे बाजूकडून येताना सुरुवातीला, स्टेशन रोड कॉर्नर, श्री काळभैरवनाथ मंदिर पूल, गावात जाणाऱ्या मुख्य चौकात, अलंकार ऑटोमोबाईल्स आदी ठिकाणच्या सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच, या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्ग व यवत गावाला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सकाळी व सायंकाळी तर वाहनांमध्ये आणखीनच भर पडते. मात्र, या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पुण्याहून यवतकडे येताना सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाळ्यात कायमच पाणी साचत असल्याने वाहनांचा अचानक वेग मंदावतो. त्यामुळे अपघात होत असून, वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. अशातच सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने रस्त्यालगत उभी असल्याने आणखीनच वाहतूक कोंडी होते. सेवा रस्त्यावर मधोमधच खड्डे पडलेले असून, रात्रीच्या वेळी अनेकदा या ठिकाणी अपघात होत आहेत.
महामार्ग प्रशासनाने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा दि. १२ रोजी यवत मुक्कामी येत असून, सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यवत येथील सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे व साचणारे पाणी यावर महामार्ग प्रशासनाकडून दरवर्षी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने तात्पुरती दुरुस्ती केली जाते. त्यामुळे पालखी गेल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत रस्त्याची पुन्हा एकदा दुरवस्था होत असल्याने, महामार्ग प्रशासनाने यवत येथील सेवा रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची; पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी
यवत परिसरातील सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची झाली असून, सेवा रस्त्यावर वेडीवाकडी लावण्यात येणारी वाहने यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. सेवा रस्त्यावर वाहने उभी असल्याने एसटी बसदेखील मुख्य मार्गावर जात असल्याने महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना याचा दैनंदिन त्रास सहन करावा लागत आहे. यवत येथील सेवा रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांवर पोलीस प्रशासन व महामार्ग प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.






