पुणे : शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणामुळे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.आता मीनाक्षी शिंदे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्या सध्या वापरत असलेल्या तब्बल 1.5 कोटी रुपये किमतीच्या आलिशान व्होल्वो कारची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी ही तक्रार नोंदवली असून, या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे, छायाचित्रे आणि व्हिडिओ पुरावेही विभागाकडे सुपूर्द केले आहेत.

या तक्रारीनुसार, मीनाक्षी शिंदे यांनी 29 डिसेंबर 2025 रोजी महापालिका निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या नावावर कोणतेही वाहन नसल्याचे म्हणजेच ‘निरंक’ असे नमूद केले होते. याशिवाय, शिंदे दाम्पत्याने आपली एकूण मालमत्ता 5 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. असे असताना त्यांच्या वापरात 1.5 कोटी रुपयांची महागडी गाडी कशी आली, असा गंभीर सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे. 25 एप्रिल 2025 रोजी ठाणे महापालिकेच्या एका कंत्राटदाराकडून ही कार त्यांना भेट म्हणून मिळाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित वाहन कांचन कन्स्ट्रक्शनशी संबंधित कंत्राटदार प्रमोद पवार यांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचा दावाही जेया यांनी केला आहे.
या गाडीच्या खरेदीसाठी नेमका खर्च कोणी केला, तिचा प्रत्यक्ष ताबा कोणाकडे आहे आणि महापालिकेच्या कामांच्या निविदा प्रक्रियेशी या भेटीचा काही संबंध आहे का, याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांकडेही निवेदन देऊन संबंधित कंत्राटदाराच्या कामांचा दर्जा व देयकांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. आरोप सिद्ध झाल्यास गुन्हा दाखल करून मीनाक्षी शिंदे यांचे नगरसेवक पद रद्द करावे, असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण शाखा व खंडणीविरोधी पथकाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यातच आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे झालेल्या या नव्या तक्रारीमुळे मीनाक्षी शिंदे यांच्यासमोरील कायदेशीर व राजकीय संकटे वाढतच चालली आहेत.








