पुणे: सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतील कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न आता अधिकच चिघळला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या कठोर आदेशांचे पालन करत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती नवले यांनी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात जाऊन आपली हजेरी लावली आहे . विशेष म्हणजे, यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगी देखील उपस्थित होत्या. या घटनेमुळे पुण्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

संस्थेच्या प्रशासन आणि आर्थिक कारभारावरही आता मोठी गदा आली आहे. राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणारी सिंहगड संस्थेची 25 महाविद्यालये आपल्या ताब्यात घेतली आहेत. याशिवाय, संस्थेच्या इतर 7 महाविद्यालयांवर आगामी 3 वर्षांसाठी प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. दुसरीकडे, संस्थेच्या एकूण 44 शैक्षणिक शाखांचे आर्थिक व्यवहार, निधीचा कथित अपहार आणि विश्वस्तांच्या मालमत्तेची कसून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही संपूर्ण चौकशी सीबीआय, सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले 60.65 कोटी रुपये अदा करण्याची हमी सोसायटीने न्यायालयाला दिली होती. परंतु, दिलेला शब्द न पाळल्यामुळे 10 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली. या आदेशानुसार, मारुती नवले यांना प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत डेक्कन पोलीस ठाण्यात हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

न्यायालयाने नवले यांच्यासह संस्थेच्या इतर विश्वस्तांवरही कडक निर्बंध लादले आहेत. सर्वांना आपले पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करण्यास सांगण्यात आले असून, परवानगीशिवाय पुणे शहराबाहेर जाण्यास सक्त मनाई केली आहे. कर्मचाऱ्यांची देणी, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा आणि महाविद्यालयांवर आलेले सरकारी नियंत्रण यामुळे मारुती नवले यांच्यासमोरील संकटे अधिक गडद झाली आहेत. आता प्रशासन आणि न्यायालय याप्रकरणी पुढे कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








