पालघर : जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुर्वेस नाक्यावर राहणाऱ्या 30 वर्षीय नरेश मोहनलाल प्रजापती यांचा जिन्यावरून पाय घसरून पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नरेश हे जेवण आटोपून आपल्या नेहमीच्या कपडे कापण्याच्या कामासाठी पहिल्या मजल्यावर जात होते. जिना चढत असताना अचानक त्यांना भोवळ आली आणि त्यांचा तोल गेला. दुर्दैवाने त्यावेळी त्यांच्या हातात कपडे कापण्याची एक धारदार कात्री होती. तोल गेल्यामुळे ते खाली पडले आणि हातातील तीच कात्री थेट त्यांच्या छातीत शिरली.

या अपघातानंतर त्यांच्या छातीतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना मनोर येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी कुटुंबीयांनी कोणताही संशय व्यक्त केला नसून कोणाविरुद्धही तक्रार नोंदवलेली नाही. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे नरेश यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे.







