अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे. पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या अचानक स्फोटामुळे लागलेल्या आगीत तीन निष्पाप नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेनंतर आरोग्य यंत्रणेच्या भयंकर ढिसाळपणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या दुर्घटनेमागील प्रमुख कारणे आणि निष्काळजीपणा समोर आला आहे. रुग्णालयातील फायर ऑडिटची मुदत 21 ऑगस्ट रोजीच संपली होती. पीडब्ल्यूडी (PWD) विभागाने तब्बल 38 दिवस याकडे दुर्लक्ष केले. 17 जुलै रोजी पत्राद्वारे सूचना देऊनही आवश्यक पावले उचलली गेली नाहीत.तसेच व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागल्यानंतरही रुग्णालयातील आपत्कालीन अलार्म वाजलाच नाही हे समोर आले आहे.

दरम्यान महिनाभरापूर्वीच लगतच्या युनिटमध्ये वॉशिंग मशीन जळण्याची घटना घडली होती. कर्मचाऱ्यांनी ही बाब दडपल्यामुळे विजेच्या यंत्रणेतील बिघाड वेळीच दुरुस्त होऊ शकला नाही.
घटनेच्या वेळी विभागात असलेल्या उर्वरित 36 नवजात बालकांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सध्या या सर्व बालकांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर अमरावतीतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या दुर्घटनेचा कसून तपास करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे. एकाच वेळी तीन कुटुंबांचे चिमुकले हिरावल्या गेल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.







