न्हावरे:शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत जोरदार मारामारी झाल्याची घटना घडली आहे. वाघेश्वर मंदिरासमोर मंगळवारी (ता.20) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. देवीची वर्गणी दिली नसल्याच्या कारणावरून वाद झाल्याचे एका फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आकाश सुरेश खोमणे (वय 26, रा. मांडवगण फराटा, ता.शिरूर, जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून दत्ता बंडू खोमणे, सुनील शिवाजी खोमणे, गोरख शिवाजी खोमणे, हरिओम सुनील खोमणे, हरि गोरख खोमणे आणि कृष्णा गोरख खोमणे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील फिर्यादीमध्ये नमूद केल्यानुसार, नवरात्रोत्सवाची मिरवणूक सुरू असताना संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी आकाश खोमणे याच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींना धक्काबुक्की व मारहाण केली. तसेच अनिल दादा जाधव याच्या डोक्यात कड्याने मारहाण करून त्याला दुखापत केली. त्याचप्रमाणे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच याच घटनेप्रकरणी दुसऱ्या गटाच्या बाजूने सुनील शिवाजी खोमणे (वय 41, रा. मांडवगण फराटा, ता.शिरूर, जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून 13 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या फिर्यादीत आकाश सुरेश खोमणे याच्यासह योगेश संजय खोमणे, संदेश प्रकाश मंडलकर, सुयोग संजय खोमणे आणि अन्य व्यक्तींचा समावेश असून, देवीची वर्गणी दिली नसल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी सुनील खोमणे यांच्या मुलांना व इतरांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अजय ऊर्फ चंद्रकांत राजेंद्र खोमणे याने कुऱ्हाडीच्या दांड्याच्या उलट्या बाजूने फिर्यादी सुनील खोमणे यांच्या मुलाच्या पायावर मारून गंभीर दुखापत केली तसेच याप्रसंगी शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी बाजूने परस्परविरोधी फिर्यादींवरून गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.






