Trimbakeshwar : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकाची 3,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना 11 April रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

पंचवटी येथील अनंता मेहेंदळे आणि त्यांचे मित्र राकेश वाघ हे दर्शनासाठी मंदिरात आले होते. देणगी दर्शनासाठी 200 रुपयांचे पास घेऊन ते रांगेत उभे असताना काही अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. कमी वेळेत व्हीआयपी दर्शन करून देण्याचे आमिष दाखवत 3,000 रुपयांची मागणी करण्यात आली. दर्शन झाल्यानंतर त्यांनी पैसे दिले, मात्र पावती मागितल्यावर आरोपींनी ती दिली नाही.
या घटनेनंतर दोघांनी रात्री 11.20 वाजता त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गोटीराम पेहरे आणि अभिषेक कडलग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोटीराम पेहरे याला ताब्यात घेण्यात आले असून अभिषेक कडलग फरार आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेश गावित करत आहेत. मंदिर ट्रस्टने या प्रकाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.








