पुणे : शिरूर-हवेली परिसरातील नागरिक गेल्या काही काळापासून वाढत्या वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमदार माऊली आबा कटके यांच्या पुढाकारातून विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात PMRDA चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी स्वतः उपस्थित होते.

नागरिकांची दैनंदिन वाहतुकीतून सुटका करणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे आमदार कटके यांनी यावेळी स्पष्ट केले. पाहणीदरम्यान त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या विविध तक्रारी व अडचणी थेट आयुक्तांसमोर मांडल्या. रस्ते रुंद करणे, पर्यायी मार्गांची निर्मिती करणे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करणे यावर त्यांनी भर दिला.

या संयुक्त दौऱ्यात अधिकाऱ्यांनी अनेक महत्त्वाच्या भागांना भेटी देऊन तिथल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यामध्ये वाडेबोलाई, आव्हाळवाडी आणि मांजरी खुर्द, थेऊर, प्रयागधाम व कोरेगाव, टाकळी भीमा, सनसवाडी आणि कोरेगाव भीमा,पिंपळे जगताप, लोणीकंद व भावडी, लोहगाव रस्ता, वाघेश्वर मंदिर परिसर, तुळापूर आणि बकोरी मार्ग यांचा समावेश आहे.
पाहणी दरम्यान PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रत्येक ठिकाणच्या तांत्रिक अडचणी समजून घेतल्या. सर्व बाबींचा गांभीर्याने अभ्यास करून प्राधान्यक्रमाने आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या दौऱ्यामुळे मतदारसंघातील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना आणि वाहतूक नियोजनाला लवकरच वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







