वाशिम: वाशिम जिल्ह्यातून एक अतिशय दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील अंबापूर गावामध्ये अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून शेजारील गावातील काही मूलं तरुणीला फोनवर बोल असा सतत दबाव टाकत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून आणि भीतीपोटी मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. आरोपींनी तरुणीला, “आमच्याशी तू फोनवर बोल, जर असे केले नाही तर तुझ्या आई-वडिलांना व भावाला ठार मारु अशी धमकी दिली होती.” याशिवाय, मुलीच्या वडिलांनाही जातिवाचक शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा छळ सुरू होता, ज्यामुळे भेदरलेल्या मुलीने अखेर जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

या घटनेनंतर मुलीच्या पालकांनी तात्काळ मंगरुळपीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत, या प्रकरणी तीन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच तरुणीच्या वडिलांना जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.आरोपी आतिश चवरे आणि अमोल टोणे यांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. मात्र, एक आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मंगरुळपीर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. गेल्या महिनाभरात वाशिममध्ये ही दुसरी गंभीर घटना आहे. यामुळे परिसरात चिंतेचे वातावरणनिर्माण झाले आहे. नागरिकांकडून या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.







