पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या ‘शिवसेना’ हे नाव आणि अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाचे, या अत्यंत महत्त्वाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू आहे. आज सुप्रीम कोर्टात यावर फैसला होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 रोजी आमदार आणि खासदारांच्या बहुमताचा आधार घेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती. या निर्णयाविरोधात आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या गटाने उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. केवळ विधिमंडळ पक्षात झालेली फूट म्हणजे मूळ राजकीय पक्षातील फूट मानली जाऊ शकत नाही. त्यामुळे संघटनात्मक संस्थात्मक रचना, पक्षाची मूळ घटना आणि पक्षप्रमुखांचे अधिकार डावलून दिलेला निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे, असा आक्रमक दावा सिब्बल यांनी खंडपीठासमोर केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू असून, सलग चालणाऱ्या या प्रक्रियेमुळे न्यायालय लवकरच आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अंतिम निकालावर महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणे आणि दोन्ही गटांचे भवितव्य अवलंबून असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लागले आहे.







