पुणे : आज महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांतील अनेक जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ (सतर्कतेचा इशारा) जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे वाऱ्याची स्थिती बदलली आहे. उत्तर प्रदेशपासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत, तसेच मन्नारच्या आखातापासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय, पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थान परिसरात 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

विशेष म्हणजे, उत्तर अंदमान समुद्रात समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची तीव्र प्रणाली सक्रिय होत असून, तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ही यंत्रणा अधिक बळकट होऊन बुधवारपर्यंत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज आहे.

या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘येलो अलर्ट’:
कोकण: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र: नाशिक (घाटमाथा), अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर.
मराठवाडा: बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड.
विदर्भ: अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.
नागरिकांनी वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसादरम्यान विजांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






