पुणे: भारतीय जेवण, विशेषत: कोकण आणि गोव्याकडील जेवण सोलकढीशिवाय (Solkadhi benefits) अपूर्ण वाटते. जेवणानंतर पिली जाणारी गुलाबी रंगाची सोलकढी केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली सोलकढी पचनासाठी उत्तम औषध मानली जाते.

सोलकढी पिण्याचे प्रमुख आरोग्य फायदे
- सोलकढी पचनक्रिया सुधारण्यासाठी उत्तम मानली जाते. जेवणानंतर ती प्यायल्याने जड जेवण सहज पचते. कोकममध्ये असलेले आम्ल आणि नारळाच्या दुधातील घटक पचनक्रिया सुधारतात.
- उन्हाळ्यामध्ये किंवा तिखट जेवणानंतर सोलकढी प्यायल्यास शरीरातील जास्त झालेली उष्णता कमी होते आणि थंडावा मिळतो. डिहायड्रेशन टाळण्यासाठीही ती मदत करते.
- सोलकढीची चव आंबट-गोड असली तरी, नारळाचे दूध पोटात थंडावा निर्माण करते. यामुळे ऍसिडिटी आणि पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.
- कोकममध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्तीवाढवण्यास मदत करतात.
- कोकममध्ये असलेले काही नैसर्गिक घटक पचनमार्गातील हानिकारक बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखतात.
सोलकढी पिण्याची योग्य वेळ
सोलकढी पिण्यासाठी जेवणानंतरची वेळ सर्वात उत्तम मानली जाते. विशेषतः मांसाहार किंवा तेलकट, तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर सोलकढी प्यायल्यास पचन त्वरित सुधारते. ताजे तयार केलेली सोलकढी त्याच दिवशी पिणे सर्वात चांगले असते.







