पुणे : साताऱ्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 35 वर्षीय महिलेने आपल्याच नात्यातील अवघ्या 8 वर्षांच्या चिमुरडीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सातारा आणि सोलापूर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी ती साताऱ्यात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे आली होती. तिथे राहताना नात्यातीलच एक 35 वर्षीय महिला तिला दररोज आंघोळ घालत असे. मात्र, आंघोळ घालण्याच्या बहाण्याने ही महिला चिमुरडीसोबत नको ते चाळे करायची. या अनपेक्षित प्रकारामुळे ती लहान मुलगी प्रचंड घाबरली आणि मानसिक दडपणाखाली आली होती.

साताऱ्यातील मुक्काम संपवून जेव्हा ही मुलगी सोलापूरला आपल्या घरी परतली, तेव्हा तिने घडलेला सर्व धक्कादायक प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. मुलीचे बोलणे ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ सोलापूर पोलिसांत धाव घेत संबंधित महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली.
हा गुन्हा सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने, सोलापूर पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी साताऱ्यात वर्ग केला आहे. शाहूपुरी पोलीस आता या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना, एका महिलेनेच लहान मुलीसोबत असे कृत्य केल्याने समाजात चिंता आणि संताप व्यक्त होत आहे.








