Shocking Crime : कृष्णगिरी जिल्ह्यात घडलेली एक हृदयद्रावक घटना समाजाला हादरवून गेली आहे. केलमंगलम परिसरात एका 25 वर्षीय आईने स्वतःच्या 5 महिन्याच्या बाळाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात आईसह तिच्या समलिंगी मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली असून, या दोघींनी एकत्र येऊन हा भीषण कट रचल्याचं तपासात उघड झालं आहे.

अटक झालेल्या आरोपींची नावे एस. भारती (वय 25, रा. चिन्नट्टी) आणि तिची मैत्रीण सुमित्रा (वय 22) अशी आहेत. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी घडली असून, केलमंगलम पोलिसांनी 6 नोव्हेंबर रोजी दोघींनाही अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीचा विवाह 38 वर्षीय के. सुरेश याच्याशी झाला होता. या दाम्पत्याला दोन मुली आणि 5 महिन्यांचा ध्रुवन नावाचा मुलगा होता. दरम्यान, भारतीचं गावातील सुमित्रासोबत समलिंगी प्रेमसंबंध होते. सुरेशला याची माहिती मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायला लागले. त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.

काही दिवसांपूर्वी मोठ्या भांडणानंतर भारती माहेरी गेली होती, पण नंतर मध्यस्थीने तिला परत आणलं. 2 नोव्हेंबर रोजी सुरेश आणि कुटुंबीय कामावर गेले असताना, भारतीने सुमित्रासोबत मिळून आपल्या मुलाला गुदमरवून ठार मारल्याचं उघड झालं.
संध्याकाळी घरी परतलेल्या सुरेशला मुलाचा मृतदेह दिसल्यावर भारतीने मुलाचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून अंत्यसंस्कार केले. पण काही दिवसांनी सुरेशला संशय आला आणि 4 नोव्हेंबर रोजी त्याने केलमंगलम पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिस चौकशीत भारतीने गुन्ह्याची कबुली दिली. तिने सुमित्राच्या सांगण्यावरून मुलाला मारल्याचं मान्य केलं. इतकंच नव्हे तर भारतीने हत्येनंतर सुमित्राला मोबाईलवर मेसेज करून गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेहाचा फोटोही शेअर केला.
तपासादरम्यान पोलिसांना दोघींचे समलिंगी संबंध दर्शवणारे काही फोटो आणि व्हिडिओ सापडले. अखेर पोलिसांनी भारती आणि सुमित्रा या दोघींनाही अटक करून न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने दोघींनाही न्यायिक कोठडी सुनावली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, समाजातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.







