नाशिक : येत्या सप्टेंबर महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र निवडणुका तोंडावर असतानाच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.नाशिकमधील मोठं प्रस्थ आणि ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरे गटाला राम राम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे नाशिकमधील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेत मोठी इन्कमिंग सुरू आहे. जिल्हा परिषद शालेय पोषण आहार महिला कर्मचारीही आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत एक हजार महिलाही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच आता माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

पक्षप्रवेशानंतर निर्मला गावित यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2019 ला शिवसेनेत आले होते. आता नेतृत्व बदललं आहे. पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन असू द्या. आजपासूनच मी कामाला लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं.







