पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत थेट खासदारकीच्या राजीनाम्याचे आव्हान दिले आहे.नरेश म्हस्के यांनी दावा केला आहे की, संजय राऊत यांना स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे होते असं त्यांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे कि, संजय राऊत यांनी आमदारांना पवईतील एका हॉटेलमध्ये बैठका घेण्यास सांगून उद्धव ठाकरे यांना विरोध करण्यास चिथावले होते.राऊतांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले, पण स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला. याशिवाय, एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्या काळात राऊत मला दररोज सकाळी आणि संध्याकाळी फोन करून काय सांगत होते, हे त्यांनीच जाहीर करावे, असे खुले आव्हान म्हस्केंनी दिले.

दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी पलटवार करत, नरेश म्हस्के यांनीच भूतकाळात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पत्र लिहिल्याचा दावा केला होता. या दाव्याचा खरपूस समाचार घेत म्हस्केंनी सांगितले की, राऊतांनी ते पत्र सिद्ध करून दाखवावे. जर असे पत्र समोर आले तर मी तात्काळ राजीनामा देईन, अन्यथा राऊतांनी खोटे बोलल्याबद्दल आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.

आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट करत म्हस्के म्हणाले की, आमची मूठ अजूनही बंद आहे आणि संजय राऊत यांनी ती उघडायला लावू नये. आपण कोणतेही घोटाळे केलेले नसून आपले जीवन उघडे पुस्तक आहे, असे सांगत त्यांनी राऊत यांना ‘फेकूचंद’ अशी उपरोधिक उपमा दिली. दोन्ही खासदारांच्या या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.







