पुणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने सचिन वाझे यांच्यावर 5 जिल्ह्यांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.त्यामुळे त्यांचा पुढील मुक्काम पुण्यात असणार आहे

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सचिन वाझे याला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये राहता येणार नाही किंवा प्रवेश करता येणार नाही. फक्त न्यायालयीन सुनावणीच्या दिवशीच त्यांना या भागात येण्याची परवानगी असेल. त्यामुळे सुटका झाल्यानंतर सचिन वाझे यांचा पुढील मुक्काम पुण्यात असणार आहे.सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रथमदर्शनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत दहशतवादी कृत्य केल्याचे दिसून येत नाही. मात्र, जामीन मिळणे म्हणजे या प्रकरणातून पूर्णपणे निर्दोष सुटका होणे असा होत नाही, कारण पुराव्यांची अंतिम तपासणी आणि खटल्याची प्रक्रिया अजून बाकी आहे.
दुसरीकडे, एनआयएने वाझे यांच्या जामिनाला स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एनआयएच्या या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार असून, वाझे तुरुंगाबाहेर राहणार की त्यांना पुन्हा झटका बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या साडेपाच वर्षांपासून तुरुंगात असलेले वाझे याला बाहेर येण्यासाठी न्यायालयाने अनेक कडक अटी लादल्या आहेत.त्यानुसार वाझे यांना 1 लाख रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि 1 स्थानिक जामीनदार सादर करावा लागेल.त्यांचा पासपोर्ट असल्यास तो एनआयए कडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जामीन मिळाल्यानंतर पुढील 7 दिवसांत मुंबईबाहेरील आपल्या वास्तव्याचा पत्ता न्यायालयाला देणे बंधनकारक आहे.








